पुणे – पुणे महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूटा पर्यंतच्या सदनिकांचा मिळकतकर माफ करा, थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविण्याची जोरदार मागणी पुण्यातील आमदारांनी विधानसभेत केली. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुणे महापालिकेची आर्थिक बाजू तपासून यासंदर्भातील योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंबई ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेवरील मिळकतकर माफी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर विधानसभेत चर्चा करण्यात आली.
‘मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घराचा मिळकतकर माफ केला आहे, नवी मुंबईचा प्रस्ताव शासनाकडे आहे. पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक १० हजार कोटी पर्यंत गेले आहे. ही कर सवलत दिली तर २०० कोटी रुपयांची तूट येऊ शकते, पण महापालिकेच्या अंदाजपत्रकातील गळती रोखली, थकबाकी वसूल केली तर तूट भरून निघू शकते. पण सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, त्यामुळे कर माफ करावा अशी मागणी धंगेकर यांनी केली.




