हिंदू धर्मात स्वार्थापोटी सख्ख्या भावालाही दगा देण्याची वृत्ती आहे असं वक्तव्य श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांनी नागपूरमध्ये केलं आहे. हिंदुस्थानावर शेकडो आक्रमणं झाली कारण हिंदूंचा स्वभावगुण त्यासाठी कारण आहे असंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. हिंदू समाज आत्मविश्वास शून्य आहे हे सांगायलाही भिडे गुरुजी विसरले नाहीत.
हिंदुस्थानाला ९६ हजार वर्षांचा इतिहास
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या नागपूर विभागाने सुभाष रोड, गीता मंदिर याठिकाणी मार्गदर्शक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिंदुस्थानाला ९६ हजार वर्षांचा इतिहास आहे. मूळ हिंदुस्थान हा हिमालयापासून हिंदी महासागराच्या मध्यापर्यंत आहे.
जपान, ब्रह्मदेश, श्रीलंका, अंदमान-निकोबार, अफगाणिस्तान, इराण, इराक, इजिप्त हे देश नंतर झाले हा संपूर्ण प्रदेश हिंदुस्थान म्हणूनच ओळखला जात होता. हिंदुस्थान संपूर्ण जगाला कुटुंबाप्रमाणे मानत होता आणि आईप्रमाणे जगाची काळजी घेत होता. परंतू कृतघ्न मुलांप्रमाणे हिंदुस्थानावर इतर राष्ट्रांनी आक्रमण केलं. हिंदुस्थानाची आत्तापर्यंत २८ वेळा शकले पडली.



