मुंबई – मागील काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्या चर्चेला काही प्रमाणात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आता प्रफुल पटेल यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होणार का, यावर भूमिका स्पष्ट केली.
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आम्ही सगळे ताकतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत.भारत जीडीपीमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षात तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो असा विश्वास आहे. त्यासाठी एक स्थिर, चांगलं आणि विकासशील सरकारची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेवर पटेल म्हणाले की, आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करतात? अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत. काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते, असंही त्यांनी नमूद केलं.



