मुंबई: गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यांवर आला असून मुंबईमधील गणेश कार्यशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची, उत्सवाच्या तयारीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे. शासकीय यंत्रणाही गणेशोत्सवाच्या नियोजनात व्यस्त झाल्या आहे. मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जन सोहळ्यात कमतरता भासू नये, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी ३०८ कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला आहे. सर्वच स्तरावर तयारीची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई महापालिका मुख्यालयात संयुक्त बैठक घेऊन गणेश मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्यासह महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे व गणेशोत्सव समन्वय महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत व अन्य पदाधिकारी मूर्तिकार संघाचे पदाधिकारी, भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आदी सर्व उपस्थित होते. यावेळी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे.



