सातारा : गतिमान जगाशी वेळेची सांगड घालण्यासाठी पारंपरिक रेल्वेसेवेला समांतर अशी वेगवान मेट्रो देशासह राज्याच्या विविध भागांत विस्तारत आहे. या मेट्रोने अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या पुण्याला आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.
त्या सेवेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच झाली. या सेवेदरम्यान आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखविण्याची संधी साताऱ्याची कन्या असणाऱ्या अपूर्वा प्रमोद अलाटकर हिला मिळाली. मेट्रोची ‘मास्क ऑन की’च्या साथीने लोकोपायलट अपूर्वाने सर्व तांत्रिक बाबींच्या मदतीने वनाझ येथून उद्घाटनाची फेरी पूर्ण केली.
अपूर्वाचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण बापूसाहेब चिपळूणकर शाळेत झाले. यानंतर तिने आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण अनंत इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. दहावीनंतर तिने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण सोलापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले. येथील शिक्षण संपवून साताऱ्यात परतल्यानंतर तिने सज्जनगड येथील ज्ञानश्री इन्स्टिट्यूटमध्ये त्याच शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला पुणे येथील कल्याणी उद्योग समूहात नोकरीची संधी मिळाली.




