मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवार म्हणजेच सुट्टीचा दिवस असतांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशनकाळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी कार्यवाहीबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे तत्पर निर्णयांसाठी, त्यांच्याकडील नस्त्यांचा तसेच कामांचा वेळेवर निपटारा करण्यासाठी ओळखले जातात. विधीमंडळ अधिवेशनकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी, निवेदने व पत्रे देण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती. परंतु विधीमंडळ कामकाजातील व्यस्ततेमुळे सर्वच पत्रे-निवेदनांवर कार्यवाही होऊ शकली नव्हती, अधिवेशन संपताच, दुसऱ्या दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात येऊन सर्व प्रलंबित कामे निकाली काढली.


