नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी हरियाणातील हिंसाचारासाठी सरकारलाच जबाबदार धरले आहे. हा विषय हिंदुत्वाचा नसून पूर्णपणे प्रशासनाच्या अपयशाचा विषय असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. एका राष्ट्रीय माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयासह अन्य मुद्द्यांवरही आपली परखड भूमिका मांडली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीसाठी प्रचार करू, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी प्रचार करणार नाही. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. याबाबतचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेईल आणि संघ आपले निर्णय अगोदर जाहीर करत नसतो. त्यामुळे पुन्हा भाजपची सत्ता आली तर मोदीच पंतप्रधान होतील हे अद्याप ठरले नसल्याची टिप्पणी स्वामी यांनी केली आहे.




