मुंबई – शिंदे गटात नाराजी वाढू लागली आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारात राष्ट्रवादी पक्षाला मंत्रीपदे मिळाली आहेत. मात्र शिंदे गटाला एकही मंत्रीपद नाही. गटाचे पदाधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढत चालली असून त्यामुळे हा गट एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.
कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ४० पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे दिले होते. शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या नवनिर्वचित पदाच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली.
आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभाग क्रमांक दोनमध्ये विभागप्रमुख हा मराठी चेहरा असावा अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या प्रकरणी दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.



