नवी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नवी मुंबई तिरंगामय झाल्याचे वातावरण पाहायला मिळाले. आज ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तसेच नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो देशप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
दिघा येथील तलावाजवळून सकाळी या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी दिघा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी तिरंग्यासोबत सेल्फी घेतली. हजारो नागरिक या बाईक रॅलीमध्ये शिस्तीने सहभागी झाले होते. खास करून युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्वच घटक भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा देत होते. सर्वांच्या हातात, बाईकवर, वाहनांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता.



