
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील भव्य कार्यालयाचा ताबा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नकार दिल्यानंतर शरद पवार गटाने अखेर एका भूखंडावर तंबू ठोकून तात्पुरत्या स्वरूपात नवीन कार्यालय सुरू केले आहे. नाशिकचे पोलिस दबावात काम करीत असून, आमचेच कार्यालय आम्हाला दिले जात नाही. त्यामुळे कायदेशीर मार्गाने आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा ताबा घेऊ,’ असा दावा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आणि शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी केला आहे.
नाशिकमधील मुंबई नाक्यावरील हायटेक कार्यालयाचा ताबा अजित पवार गटाने पोलिस बंदोबस्तात घेतला होता. या ठिकाणी शरद पवार गटातील आव्हाड, शेलार यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी बंदोबस्त वाढविल्याने ताबा घेता आला नाही. त्यामुळे शरद पवार गटाने मुंबई-आग्रारोडवरील छान हॉटेलमध्येच तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय थाटले होते.
हायटेक कार्यालय मिळविण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला. परंतु, राज्यातील सत्तेचा फायदा अजित पवार गट घेत असल्याने हा ताबा मिळत नसल्याने अखेर याच हॉटेलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तंबू ठोकत नवीन कार्यालय सुरू करीत तेथून कामकाज सुरू केले आहे. संघर्षात दीड महिना गेल्यानंतर आता शरद पवार गटाने आगामी निवडणुका लक्षात घेत पक्षविस्तार व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी नवीन कार्यालयाचा तंबू ठोकला आहे.


