जळगाव : राज्यासह देशभरात विरोधकांवरच ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून दबाव आणल्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. ईडीने पीडित असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे गट) च्या नेत्यांपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे म्हणजेच शरद पवारांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर आले असल्याचे दिसून येत आहे. कारण, ईडी आणि आयकर विभागाने जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर छापे मारले असून, ज्वेलर्स मालकाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ वर्षे खजिनदार राहिलेल्या तसेच जळगाव शहरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या प्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्ससह त्यांच्या मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर सक्तव संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने छापा मारला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ईडीकडून अशाप्रकारे प्रत्यक्षरित्या शरद पवारांच्या निकटवर्तीयांवर अशी कारवाई केली आहे.
एकूणच या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण ६ कंपन्यावर ईडीच्या पथकाने छापा मारला. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा आणि त्यामध्ये ६० हून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.



