कोल्हापूर : राज्यात मागील साडेतीन वर्षात तीन सरकार बदलले असून, राज्य चलबिचल झाले आहे. नागरिकांच्या मनातही संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याला कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सभेमध्ये बोलताना केले.
“राज्यघटना ही ताकद असून, महाराष्ट्र एका योग्य दिशेने जाण्यासाठी दुफळी नको तर एक विचाराने काम करा,” असेही त्यांनी नमूद केले. “मध्यंतरी वेगवेगळ्या घटना घडल्या. त्यात कोल्हापूरने सातत्याने पुरोगामी विचार जपण्यासाठी पुढाकार घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार तोच विचार पुढे नेत आहेत. कोल्हापूर जिल्हा नेहमी पवार यांच्या बाजूने उभा राहिला आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार घेऊन पवार काम करत आहेत. ते स्वाभिमानी नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी जशी सांभाळली तसे देशाचे संरक्षणमंत्री म्हणून काम केले. त्यावेळी देशात शांतता प्रस्थापित झाली. कृषिमंत्री असताना त्यांनी अन्नधान्याच्या उत्पादनात अधिकाधिक वाढ केली.” असे शाहू महाराज म्हणाले.
“आधुनिक काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समतेचा विचार प्रस्थापित केला. पक्ष कोणताही असो, त्याला हा विचार घेऊनच पुढे जावे लागते. पुरोगामी विचार जपत असताना अधूनमधून काय घडतंय? हे मात्र लक्षात येत नाही. महाराष्ट्र पुरोगामी राज्य असले तरी अलिकडच्या काळात तसे दिसून येत नाही. त्यात दुरुस्ती करावी लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य दिशेने जायला हवे. तरच देशाच्या राजकारणात तुम्ही बदल करू शकाल. संविधान ही ताकद असून, मूलभूत अधिकार कोणी बदलू शकत नाही. राजीव गांधी यांनी पक्षांतरबंदी कायदा केला. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांनी तो मजबूत केला. या कायद्याला बगल देऊन काम केले जात आहे,” असेही त्यांनी सांगितले.
त्या नेत्याला टोला
“काही दिवसांपूर्वी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एक मंत्री भेटायला आले होते. त्या वेळी त्यांना हे असे का? कसे व कधी घडले? याची विचारणा केली. ते घाईत असल्याने नंतर खुलासा करतो असे म्हणाले होते. मात्र, त्यांना अजून वेळ मिळालेला दिसत नाही, ” असा टोला शाहू महाराज यांनी संबंधित नेत्याचे नाव न घेता लगावला.



