पुणे : पुणे-दौंड रेल्वे प्रवासात १० मिनिटांची बचत होणार आहे. पुणे- दौंड दरम्यानच्या मार्गावरून रेल्वे गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतील, असे आदेश मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी पुणे विभागाला दिले आहे.
सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार असून पुणे-दौंड-पुणे हा प्रवास वेगवान होणार आहे, असे त्यांनी सांगितले. पुणे-दौंड रेल्वे मार्गावर काही दिवसांपूर्वी रुळांची क्षमता वाढविण्यात आली आहे. मध्य विभागाचे मुख्य संरक्षक आयुक्त मनोज अरोरा यांनी या मार्गाची तपासणी करून काही सूचना दिल्या होत्या. पुणे रेल्वे प्रशासनाने त्या सूचनांची पूर्तता केली. त्यानंतर मुख्य संरक्षक आयुक्तांकडून या मार्गाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानंतर मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी देखील या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे गाड्या ताशी १३० किमी वेगाने धावण्यास मंजुरी दिली आहे.
त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. पुणे हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे विभाग आहे. पुण्याहून दक्षिण व उत्तर भारताला जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे. सध्या पुणे विभागात संपूर्ण विद्युतीकरणाचे काम झाले आहे. पुणे-दौंड दरम्यान दुहेरीकरण व मार्गाचे विद्युतीकरणाचे याआधीच पूर्ण झाले आहे.




