पुणे : देशात लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. मुंबईत एकाच वेळी भाजपा, शिंदे गट व अजित पवार गट महायुतीची बैठक व दुसरीकडे इंडिया आघाडीची राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची बैठक होताना पाहायला मिळत आहे. त्याचवेळी दिल्लीत एक देश, एक निवडणूक शक्य आहे का? याची चाचपणी करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. आता त्यात तिसऱ्या मोठ्या चर्चेची भर पडली आहे. ही चर्चा म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची! यावर आता अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
नेमकं काय घडतंय?
गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अद्याप झालेली नाही. मात्र, पुढील वर्षी या मतदारसंघातून भाजपाचे सुनील देवधर इच्छुक असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात चालू आहे. त्यापाठोपाठ अवघ्या काही तासांत खुद्द मोदीच या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, यानंतर भाजपाचे स्थानिक नेते संजय काकडेंनी थेट मोदींना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे.
माध्यम प्रतिनिधींनी या चर्चेबाबत विचारणा केली असता अजित पवारांनी तो मोदींचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. “या चर्चेवर प्रश्नचिन्ह आहे. रोज काहीतरी बातम्या येत असतात. मोदींचा स्वत:चा मतदारसंघ पहिल्यापासून गुजरातचा आहे. तरी ते मागे वाराणसीतून निवडून आले आहेत. सुरुवातीला तर दोन्ही मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नावावर दोन्ही वेळेला भाजपाच्या ३०० पेक्षा जास्त जागा निवडून आलेल्या उभ्या भारताने पाहिल्या आहेत”, असं अजित पवार म्हणाले.



