मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे. म्हणून त्याला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. नीती आयोगाच्या माध्यमातून देशातील चार शहरं निवडण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून मुंबई, गुजरातमधून सूरत, आंध्र प्रदेशमधून विशाखापट्टणम आणि चौथं उत्तर प्रदेशातून वाराणसी. विरोधक सांगतायत हा मुंबई वेगळी करण्याचा डाव. पण महाराष्ट्राला माहिती आहे की मी खरं बोलतो. थातुरमातुर बोलण्याची मला सवय नाही. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई कुणाचा बाप काढू शकत नाही. हे निर्विवाद सत्य आहे असं म्हणत अजित पवार यानी इंडिया आघाडीतील नेत्यांच्यावर प्रखर टीका केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत इंडिया आघाडीची बैठक चालू होती. आज ही बैठक संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आघाडीतील नेतेमंडळींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. तर दुसरीकडे आज मुंबईतच राज्यातील सत्ताधारी महायुतीचीही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं. यावेळी अजित पवारांनी मुंबईबाबत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर उत्तर दिलं.
काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या विकासासंदर्भात केंद्रीय नीती आयोगाकडून नियोजन आराखडा आणि त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली. मुंबईच्या विकासाचा निर्णय आता केंद्र सरकार घेणार का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. तसेच, हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा आरोपही विरोधकांनी केला. या आरोपांना आज अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.



