जम्मू काश्मीरच्या सीमाभागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच राहतात. या कुरापतींना हाणून पाडण्यासाठी लष्कराकडूनही तोडीस तोड प्रयत्न केले जात आहेत. पण, सध्या मात्र इथं तणावाच्या वातावरणात आणखी भर पडताना दिसत आहे. कारण, जवळपास दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या अनंतनाग येथे सुरु असणारं एनकाऊंटर तिसऱ्या दिवशीही सुरुच असल्याचं कळत आहे.
कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशीष धौंचक आणि डीएसपी मुजम्मिल हुमायूं भट यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या द रजिस्टेंस फ्रंट संघटेनेच्या कमांडर उजैर आणि गाजी उस्मान या दोन्ही दहशतवाद्यांना अनंतनागच्या गडोल येथील वनपरिसरात संरक्षण यंत्रणांनी घेरलं आहे. दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या कारवाईमध्ये लष्कराच्या पॅरा कमांडो, राष्ट्रीय रायफल आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील जवामानांचा सहभाग असून, दहशतवाद्यांचा मागोवा घेत ही पथकं आता त्यांच्यासाठी आखलेल्या रणनितीनुसार पुढे जातना दिसत आहेत. यासाठी हेरोन ड्रोन आणि श्वानपथांचीही मदत घेतली जात असून, इथं असणाऱ्या घनदाट वनक्षेत्रार ड्रोन घिरट्या घालत असल्याचं पाहायला मिळत आहे.




