सातारा : लंडन येथील संग्रहालयात असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे भारतात आणण्याची प्रक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फतीने सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या दोन ते तीन महिन्यांत ती वाघनखे भारतात येतील.
यानंतर ती मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर येथे शिवप्रेमींना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. सातारकरांनाही ती पाहता यावीत, यासाठी ती साताऱ्यात आणावीत, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. यास त्यांनी सहमती दर्शविल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून स्वराज्यावरील आक्रमण परतविण्यासाठी वाघनखांचा वापर केला होता. ही वाघनखे १८२४ मध्ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षांनी ती वाघनखे भारतात परत येणार असून, ती राज्याच्या विविध भागांत नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्यात ती येणार नसल्याने शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
याची दखल घेत शिवेंद्रसिंहराजेंनी त्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी शनिवारी चर्चा केली. चर्चेत शिवेंद्रसिंहराजेंनी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने सातारा भूमी पावन झाली असून, येथील अजिंक्यताऱ्यावर त्यांनी काहीकाळ वास्तव्य केले होते. यामुळे त्यांची वाघनखे सातारकरांनाही पाहता यावीत व ती सातारा येथील संग्रहालयात ठेवली जावीत, अशी इच्छा व्यक्त केली.
यानुसार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांची वाघनखे साताऱ्यातही आणण्यासाठी कार्यवाही करण्याचे वचन दिले. यामुळे सातारकरांनाही इतिहासाची साक्ष असणाऱ्या ती वाघनखे पाहण्याची संधी मिळणार असून, त्यासाठीची तारीख ठरल्यावर त्यासाठीचे जल्लोषी स्वागताचे नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकाद्वारे दिली आहे.



