पुणे : कात्रज- – कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने तसेच या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी ५० वॉर्डन नेमण्याचे आदेश महापालिका आणि पोलिसांना दिले होते. त्यातील २५ वॉर्डन सकाळी तर २५ वॉर्डन सायंकाळी नेमले आहेत. मात्र, शुक्रवारी महापालिका आयुक्त स्वतः अतिरिक्त आयुक्तांसमवेत रस्त्याच्या पाहणीसाठी गेले असता, या रस्त्यावर ऐन वाहतुकीच्या वेळी अवघे तीन ते चार वॉर्डन दिसून आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी वाहतूक नियमनासाठी चौकात असलेल्या पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता; सर्व वॉर्डन कामावर असून पोलिसांनी चक्क त्यांच्या सह्यांचा कागद अतिरिक्त आयुक्तांच्या हातत ठेवला. त्यामुळे हजेरी लावून हे वॉर्डन नेमके कुठे गायब होतात, असा प्रश्न महापालिका आयुक्तांनाही पडला आहे.
शुक्रवारी दुपारी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यासह इतर कामांच्या आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना चर्चेसाठी बाणेर येथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच पथ विभागाचे अधिकारी गेले | होते. मात्र, या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती. तसेच, वॉर्डनही दिसले नाहीत. याबाबत आयुक्तांनी विचारणा केल्यानंतर महापालिकेने दिलेले वॉर्डन रस्त्यावर का नाहीत? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. त्याचवेळी समोर काही वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसून आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी ‘वॉर्डन आले नाहीत का,’ असा प्रश्न विचारला असता, ते आलेत मात्र आता जागेवर नसतील. त्यांनी सकाळीच सह्या केल्याची माहिती देण्यात आली. मात्र, वॉर्डन कोठेही नव्हते. त्यामुळे नक्की वाहतूक नियमनासाठी वॉर्डन असताता की नाही, हे उघड झाल्याने वॉर्डनचा खर्च कोण लाटतंय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




