राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. मोजके नेते सोडले तर कोणता आमदार कोणत्या गटात आहे, याचं चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही. राजकीय नेत्यांसह लोकांमध्येही याबाबत संभ्रम आहे. पक्षात कोणतीही फूट पडली नाही, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं मान्य केलं आहे. तसेच दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.
या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही फूट पडली नाही, असं शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, तरीही निवडणूक आयोगानं पक्षफुटीसंदर्भात सुनावणीची तारीख दिली आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, “शरद पवारांनी निवडणूक आयोगाला जे उत्तर दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. मला कुणीही विरोध केला नाही. कुणीही माझ्या धोरणांना जाहीरपणे विरोध केला नाही. कुणीही वेगळा सूर काढला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत माझी अध्यक्षपदी निवड झाली. सगळेच मुद्दे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात मांडले होते.