नाशिक ; नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे नाफेड मार्फत सुरू असलेली दोन केंद्रही बंद असल्याने शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.
नाशिकला कांदा प्रश्न नवीन नाही. गेल्या काही महिन्यात सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अनेक आंदोलने पाहायला मिळाली. सुरुवातीला केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाला होता. त्यानंतर केंद्राने नाफेडकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता कुठे कांदा लिलाव सुरू होते, तोच आता कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत.
- शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
एकीकडे दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कुठलाही सकारात्मक तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.



