मुंबई ; – राज्यात उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पुन्हा एकदा ओढ दिल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील स्थिती गंभीर असून राज्यातील १३ जिल्हे रेड झोनमध्ये असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील बळीराजा अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
यंदा मान्सूनचा पाऊस सर्वत्र झाला नाही. कोकण आणि गोव्याचा काही भाग, तसेच ठाणे आणि नांदेड जिल्हा सोडल्यास इतर ठिकाणी पाऊस सरासरी इतका आहे. राज्यातील १३ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. यात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर तेराही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यंदा राज्यात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, ज्यात ३६ पैकी १३ जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात मराठवाड्यातील आठपैकी ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड आणि लातूर जिल्हा सोडल्यास ६ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. त्यामुळे त्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असून या दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सप्टेंबरही जाणार कोरडा ?
जून ते सप्टेंबर असा पावसाचा कालखंड आहे. तर ऑगस्ट आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होत असतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असते. मागील काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच असतो. दरम्यान, आजपासून पुढील पाच ते सात दिवसांचा अंदाज पाहिल्यास या काळात खूप असा पाऊस होईल याची शक्यता कमीच असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.



