नवी दिल्ली : दिल्लीचा हा माझा पूर्वनियोजित दौरा आहे. अनेक कार्यक्रम आणि बैठका आहेत, त्यात मला सहभागी व्हायचे आहे, त्यामुळे मी दिल्लीला चाललो आहे, असे स्पष्टीकरण विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले.
आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दिरंगाईबद्दल कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. आम्ही तीन महिन्यांची मुदत घातली नव्हती. पण, विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखायला हवा. गेल्या चार महिन्यांत अध्यक्षांनी केवळ एक सुनावणी घेतली. त्यानंतर पुढची तारीखही अध्यक्षांनी दिली नाही, अशी नाराजी व्यक्त केली हाेती.
सरन्यायाधीशांच्या नाराजीनंतर ॲड. राहुल नार्वेकर हे आज (ता. २१ सप्टेंबर) दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले होते. त्याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात असतानाच खुद्द ॲड. नार्वेकर यांनीच पुढे येऊन आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत भाष्य केले आहे. त्यात त्यांनी आपण दिल्लीला का जात आहोत, हे स्पष्टपणे नमूद केले आहे.



