पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार रोहित पवार संचलित बारामती अॅग्रोच्या इंदापूर तालुक्यातील शेठफळ गढे येथील डिस्टलरी प्लांटला आज (28 सप्टेंबर) पहाटे 2 वाजता प्रदूषण महामंडळाकडून नोटीस बजावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. येत्या 72 तासांत हा प्लांट बंद करण्यात यावा, असे नोटिशीत महामंडळाकडून सांगण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. नोटीस मिळाल्यानंतर रोहित पवारांनी ही कारवाई राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.
राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्याने कुठला तरी द्वेष मनात ठेवून, आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका भागावर ही कारवाई करण्यात आली, असे रोहित पवार यांनी नोटीससंदर्भात सोशल मीडियातून सांगितले आहे.
रोहित पवार म्हणाले, “युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करताना, भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलत असतो, ठाम भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. पण अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते, ही मराठी माणसाची खासियत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“हा लढा मी लढणारच आहे. परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही, असेही रोहित पवार म्हणाले.




