पुणे : पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाले. मोठा उत्साहात विसर्जन मिरवणूक पुणे शहरात सुरु होती. गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या….असा आग्रह करत होते. पुण्यातील वातावरण अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे होते. परंतु सहकारनगरमधील घटनेमुळे या उत्साहाला गालबोट लागले. पुण्यातील तळजाई भागात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यात लहान मुले आणि महिला जखमी झाल्या.
दोन टोळीमधील वाद आला समोर
पुणे येथील गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट दोन टोळीमधील वादामुळे लागले. जुन्या वादातून शेंडी आणि सुर्या टोळी यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटात तळजाई परिसरात तुंबळ हाणामारी झाली. या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन्ही गट एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगड-विटा मारताना दिसत आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुले जखमी झाले आहेत.
दोन्ही टोळीचे गणेश मंडळ
शेंडी टोळी आणि सूर्या टोळीमध्ये अनेक दिवसांपासून वाद आहे. दोन्ही टोळीचे मंडळ तळजाई परिसरात आहे. त्यामुळे त्यांच्यात अनेक वेळा वाद होत असतात. गुरुवारी दुपारी दोन वाजता दोन्ही टोळीमध्ये पुन्हा वाद झाला. गणेश विसर्जन मिरवणुकीत हा वाद उफळून आला. दरम्यान सहकार नगर पोलिसांनी या प्रकरणी किती जणांवर गुन्हा दाखल केला? ही माहिती समोर आली नाही
का झाला वाद…
सूर्या गणेश मित्रमंडळ आरती करण्यासाठी शिंदे शाळेच्या विसर्जन हौदावर आले. त्यावेळी शेंडी टोळीचे मंडळ असलेल्या इंद्रधनुष्य मंडळाने वाद घातला. त्यानंतर दोन्ही टोळींमध्ये जोरदार हाणामारी झाली. अगदी मिळेल त्या वस्तूने एकमेकांवर वार केले जात होते. रस्त्यांवरील दगडे फेकले जात होते. यामध्ये महिला आणि लहान मुले असल्याचे पाहिले गेले नाही. यामुळे काही महिला आणि मुलेही गंभीर जखमी झाले आहेत.




