काटेवाडी, बारामती : ‘अकारण कोणाला नोटीस येत नाही. कोणीही जाणून-बुजून हे करत नसते. फक्त काही जणांबद्दल बातम्या येतात. नोटीस देणारी यंत्रणा त्यांचे काम करत असते. त्याला उत्तर दिले की, तो विषय संपतो. या गोष्टीला कोणी वेगळे राजकीय स्वरूप देऊ नये, अशी माझी विनंती आहे,” असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना दिला.
पवार रविवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कारखान्याला पर्यावरण विभागाची नोटीस आली आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, “मागच्या वेळी श्रीनिवास पवार यांच्या शरयू अॅग्रो या कारखान्याला नोटीस आली होती. आमच्याही काही युनिटला अशीच नोटीस आली होती. ही एक प्रक्रिया असते. कोणताही कारखाना चालवत असताना तसेच पर्यावरणाचा विचार करता ‘झीरो डिस्चार्ज’ चा विचार करणे गरजेचे आहे.
वाघनखांबाबत गैरसमज नको……
छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबद्दल इतिहास तज्ज्ञ वेगवेगळे दावे करत आहेत. वाघनखे आणण्यासाठी सरकारमधील जे अधिकारी प्रयत्न करत आहेत त्यांचाही याबद्दल काही अभ्यास असेल. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत हा विषय मी मांडणार आहे. ही वाघनखे पुढची तीन वर्षे महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत. यावेळी अनेक शिवप्रेमी व तरुण मंडळी ही वाघनखे पाहण्यासाठी जातील. त्यामुळे कोणाचाही गैरसमज झाला नाही पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली.



