मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्यावर मुंबई व पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले. त्यापाठोपाठ सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपासही बंद करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असणाऱ्या रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात होतं. त्यानुसार आता त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर (ट्विटर) याची माहिती देणारी पोस्ट केली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांची पोस्ट
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात “महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महांचालकपदी श्रीमती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन!” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई व पुण्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.


