‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली.
अभिजीत मजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली असून या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग भुसारी यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.