मुंबई – समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या ट्रक आणि ट्रव्हलरच्या अपघातात १४ प्रवाशांचा मृत्यु झाला. याप्रकरणात अपघातापुर्वी औरंगाबादचे दोन सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांसह ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. मात्र, महामार्गावर वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या क्रमांकाची फक्त नोंद करण्याच्या सुचना असतांना, ट्रक थांबवण्याचे कारण काय ? आणि कोणत्या अधिकाऱ्यांने असे आदेश दिले होते. या दिशेने परिवहन आयुक्त कार्यालयाचा तपास सुरू आहे.
परिवहन विभागाने सांगितल्या प्रमाणे महामार्ग, द्रुतगती महामार्गांवर वाहन कुठेही थांबवता येत नाही. टोल नाक्यांवर चालकांचे समुपदेशन करण्याचे धोरण आहे. समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या अपघाताचे स्थळ गंगापुरच्या ६ किलोमिटर आधीचे आहे. त्यामूळे अशा ठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक कोणाच्या आदेशाने महामार्गावर वाहन थांबवून कारवाई करत होते. असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याशिवाय भरारी पथकामध्ये कारवाई करतांना वरिष्ठ अधिकारी म्हणजेच मोटार वाहन निरिक्षक सोबत राहणे अनिवार्य आहे.
मात्र, याप्रकरणात दोनच सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक महामार्गावर वाहन थांबवून कारवाई करत असल्याने या घटनेवर अनेक शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे. याप्रकणामूळे परिवहन विभागातील अंतर्गत कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहे.