नाशिक :- साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या, नाशिक जिल्ह्यातील वणी येथील श्रीसप्तशृंगी निवासिनी देवीच्या मंदिरासाठी चांदीचा नवीन नक्षीदार गाभारा पु. ना. गाडगीळ आणि सन्सने ( पीएनजी सन्स) केला असून, नवरात्रीपासून नव्या स्वरूपात भाविकांना मंदिरातील गाभाऱ्यात चांदीतील केलेल्या सुबक कामाचा साज अनुभवता येतो आहे.
मंदिरातील गाभान्यास चांदीने सुशोभित करण्याचा निर्णय सप्तशृंगी मंदिर समितीने घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रेड असलेल्या पीएनजी सन्सची निवड केली. या संदर्भात मंदिर समितीचे भूषणराज तळेकर म्हणाले, पीएनजी सन्सने या पूर्वी देवीसाठी सोन्याचे अलंकार घडविले होते. त्यांचा अनुभव गुणवत्ता आणि सर्वोत्तम कारागिरीमुळे समितीने पीएनजी सन्सला गाभाऱ्याचे काम देण्याचा निर्णय घेतला. पीएनजी सन्सचे अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ म्हणाले, गाभान्यातील नक्षीकाम करण्यापूर्वी आम्ही त्यावर अभ्यास केला. नक्षीकामात परंपरेला अनुसरून हत्ती, विविध पक्षी, पाने, फुले, वेली, घंटा, कीर्तिमुख, नवग्रह, मोर, शंख, कमळ आदी शुभ प्रतीकांचा वापर नक्षी म्हणून केला. पीएनजी सन्सच्या वतीने नाशिक झोनचे सेल्स प्रमुख राहुल शेवकरी व श्रीकांत कुबेर यांनी काम पाहिले. कामाच्या तपशिलाबाबत शेवकरी म्हणाले, देवस्थानाला आम्ही सुचविलेल्या चांदीतील नक्षीकामाच्या रचना आवडल्या त्यानुसार सव्वा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. सुमारे ४६५ किलो चांदी मंदिर समितीने आम्हाला उपलब्ध करून दिली. सागवानी लाकडावर चांदीचे नक्षीकाम बसविले आहे.
यापूर्वी देवीचे नवे अलंकार नवरात्रीपूर्वीच पूर्ण झाले होते. मंदिर समितीने या वर्षी नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मंदिर समितीचे सदस्य तळेकर, मनज्योत पाटील, अँड. ललित निकम, दीपक पाटोदकर, प्रशांत देवरे, तहसीलदार वारूळे यांचे सहकार्य लाभले. चांदीतील नक्षीकामाची कारागिरी आम्ही सेवाभावाने केली आहे, असे श्रीकांत कुबेर यांनी नमूद केले.



