मुंबई : – सध्या मराठा व धनगर समाजाकडून आरक्षणाची तीव्र मागणी केली जात आहे. त्यांची मागणी रास्तच आहे. भाजपने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याची पोकळ ग्वाही देऊन झुलवत ठेवले. पण केंद्र व राज्यात सरकार आल्यानंतरही त्यांनी हे आश्वासन पूर्ण केले नाही, त्यांनी या समाजाची घोर फसवणूक केली. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची गरज आहे.
कॉंग्रेस सचेत आल्यानंतर ही जनगणना करून मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल,’ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
राज्यात गत काही दिवसांपासून आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. भाजप आरक्षणावरून २ समाजांत वाद निर्माण करुन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे पाप करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाला हात लावणार नाही सांगतात. तर दुसरीकडे, तेच फडणवीस मराठा समाजाला भाजपच आरक्षण देवू शकते अशी वल्गना करतात. प्रत्यक्षात ते या दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत, असेही पटोले म्हणाले.
केंद्र सरकारने मनावर घेतले तर आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सुटेल. जातनिहाय जनगणना हा यावरील उपाय आहे. पण भाजपाचा जातनिहाय जनगणनेस विरोध आहे. काँग्रेसने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास ही जनगणना करण्याचे आश्वासनही दिले आहे, असेही ते यावेळी म्हणाले..



