मुंबई : “सार्वभौमत्वाच्या नावाखाली पक्ष फोडणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या नार्वेकरांचे नाव देशाच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदले जाईल. पदावर नसतील तेव्हा त्यांना रस्त्यावरून फिरणे मुश्कील होईल, अशा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. दुसरीकडे ‘फुकट प्रसिद्धीसाठी सवंग शेरेबाजी करणाऱ्या राऊत यांच्या आरोपांना उत्तर देणे म्हणजे स्वतःची प्रतिष्ठा कमी करून घेण्यासारखे असल्याचा टोला नार्वेकर यांनी लगावला.
आमदार अपात्रता प्रकरणावर बोलताना राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर आज जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे आणि अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे असे ८० आमदार मूळ घरांची लूट करून दुसऱ्या घरात शिरले आहेत. त्या दरोडेखोरांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सार्वभौमत्वाचे नाव देऊन संरक्षण देत असतील तर त्यांचे नाव देशाच्या काळ्याकुट्ट इतिहासात नोंदले जाईल. ते जेव्हा खुर्चीवर नसतील तेव्हा, अशा लोकांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल. या राज्याची जनता माफ करणार नाही,” असा इशारा राऊत यांनी दिला.



