
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यातील राजकीय वाद कायम चर्चेचा विषय असतो. मात्र हे दोन्ही नेते आज (21 ऑक्टोबर) मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये एकत्र आले होते. यामुळे प्रकाश आंबेडकर लवकरच मविआत प्रवेश करणार का? अशा चर्चांना आता उधाण आले असून “इंडिया’ आघाडीत सहभागी होणार असल्याचेही बोलले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “प्रॉब्लेम्स ऑफ रुपी’ प्रबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर प्रकाश आंबेडकर हे शरद पवार यांच्या भेटीला गेले. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
या दोघांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याबद्दल सर्वांनी उत्सुकता आहे. शरद पवार यांची भेट झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, दादाभाई नौरोजी यांनी त्या काळी ब्रिटीशांवर एक आरोप केला होता की, तुम्ही सर्व आम्हाला लुटत आहात. पण दादाभाई नौरोजी यांनी त्यावेळेस केलेल्या आरोपांची व्यवस्थित मांडणी केली नव्हती.
बाबासाहेबांनी “प्रॉब्लेम ऑफ रुपी’च्या माध्यमातून ब्रिटीश भारताला कसे लुटतात याची मांडणी केली. रुपयाची किंमत स्थिर राहिल्यास देशातील गरीबाची आर्थिक स्थिती बदलू शकते. या पुस्तकाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मी वक्ता म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होतो.