
इंदापूर – मराठा गायकवाड आयोगाने 12 ते 13 टक्क्यांनुसार मराठा समाज मागास सिद्ध केला, तरी देखील मराठा समाजाला आरक्षण नाही. कायदा एखाद्या दिवसात पारित करता येतो. आमची जात मागास सिद्ध झाली आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ दिला जाणार नाही, असे सरकारला मनोज जरंगे पाटील यांनी ठणकावले.
सकल मराठा समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने शनिवारी (दि. 21) शहरातील 100 फुटी रोड तहसील कचेरी शेजारील प्रांगणात जरांगे-पाटील यांची महासभा पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.तालुक्यातील मराठा बांधवांनी उत्स्फूर्त संख्येने प्रतिसाद दिला.
जरंगे पाटील म्हणाले की, केवळ या मराठा समाजाचे स्वप्न आरक्षणा वाचून धुळीस मिळाले आहे म्हणूनच उन्हातानात, मराठा समाज एकत्र आला. आता ऊन आणि वारा बघायची गरज नाही; मात्र आपल्या लेकरांना न्याय दिल्याशिवाय मागे हटायचे नाही. हे मराठ्यांनी आता मनात धरले आहे.
मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हणले की समित्या पाहिजेत. कागद पाहिजे, कागदपत्राचा पाठपुरावा पाहिजे, ओबीसीला आरक्षण द्यायचे म्हटले की कुठलेही समितीची गरज नाही. कोणत्याही अहवालाची आवश्यकता नाही. फक्त एका शासन निर्णयावर आरक्षण दिले जाते. मायबाप मराठ्यांनो आलेली संधी घालू नका, असे आवाहन त्यांनी केले.