मुंबई : भाजपाच्या ट्वीटर (एक्स) हँडलवरुन ‘मी पुन्हा येईन’, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कवितेचा व्हीडिओ पुन्हा एकदा शेअर झाल्यामुळे एकच खळबळ माजली त्यानंतर थोड्यावेळाने हे ट्वीट डीलिट करण्यात आलं.
हा व्हीडिओ आता अचानक कसा प्रसिद्ध करण्यात आला तसेच तो परत एकदा प्रसिद्ध का झाला यावर चर्चा सुरू आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नवा बदल तर होणार नाही ना असा प्रश्न सोशल मीडियात विचारला जात आहे.
यावर भाजपातर्फे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्वीटरवर लिहितात, “हा व्हीडिओ सोशल मीडिया मर्यादित आहे. जनादेश यात्रेतील हा व्हीडिओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की,एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये”



