पुणे : राज्यात पवार कुटुंबाच्या दिवाळीकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अजित पवार यांनी वेगळी राजकीय चूल मांडल्याने पवार कुटुंबाच्या दिवाळीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार गोविंदबागेत येतील की नाही ही चर्चा सुरू असतानच अजित पवार यांनी गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
अजित पवार यांनी काल संध्याकाळी उशिरा गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गोविंद बागेत आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर संध्याकाळी अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत आले. सर्वांनी एकत्र जेवण केलं. गप्पा मारल्या. त्यानंतर एकत्रित फोटोही काढले. आज भाऊबीज असल्याने सुप्रिया सुळे या सकाळीच काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या.
शरद पवार काठेवाडीत
सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर दोन तासाने शरद पवारही अजितदादा यांच्या निवासस्थानी आले आहेत. अजितदादा यांच्या घरी भाऊबीजेचा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने पवार कुटुंब अजितदादांच्या घरी जमलं आहे. या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन दुपारचं जेवण घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.



