मुम्बई : क्रिकेटचा महाकुंभ असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार(19 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या अंतिम सामन्याबद्दल क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश आणि जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती हा हा सामना पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी स्वतः आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी (17 नोव्हेंबर) बैठक घेऊन सुरक्षा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित व्यवस्थेचा आढावा घेतला. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर ICC क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना पाहतील. त्यांच्यासह देश आणि जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती या सामन्यासाठी येणार आहेत.
6 हजारांहून अधिक पोलीस तैनात
व्यवस्थेविषयी माहिती देताना अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक म्हणाले की, 6,000 हून अधिक पोलिस तैनात केले जातील, त्यापैकी 3,000 मैदानाच्या आत असतील. याशिवाय, संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एनडीआरएफच्या दोन तुकड्या, चेतक कमांडोच्या दोन तुकड्या आणि बॉम्ब निकामी पथकाच्या 10 तुकड्या तैनात केल्या जातील.
अहमदाबाद अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितल्यानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट संघ ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तिथे अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. याशिवाय स्टेडियममध्ये अग्निशमन दल आणि बचाव उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.
रात्री एक वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार
1,00,000 पेक्षा जास्त प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचतील अशी अपेक्षा असल्याने सुरक्षेव्यतिरिक्त, रहदारी हेदेखील एक आव्हान असल्याने सामन्याच्या दिवशी प्रवासासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याची विनंती मलिक यांनी केली. रात्रीपर्यंत एक वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे.




