मुंबई : राज्यातील तिसऱ्या मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वे बोर्डाला सादर केला. या अहवालाला रेल्वे बोर्ड आणि त्यानंतर केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्पाचे
काम सुरू होईल. अतिवेगवान प्रवासासाठी २००७-०८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात यूपीए सरकारने बुलेट ट्रेनची कल्पना मांडली होती, परंतु, आर्थिकदृष्ट्या हा खूपच महागडा प्रकल्प असल्याने तो परवडणार नसल्याच्या निष्कर्षामुळे ही संकल्पना मागे पडली. त्यानंतर केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेनचा प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१५ साली बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातून तीन बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे. मुंबई अहमदाबाद, मुंबई-नागपूर व्हाया नाशिक आणि मुंबई-हैदराबाद व्हाया पुणे या तीन मागाँवर बुलेट ट्रेन धावणार आहे.
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रवास अवघ्या ३ तास ५० मिनिटांचा असेल; तर मुंबई-हैदराबाद कामशेत पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, हैदराबादशी जोडले जाणार आहे. या मार्गावर ताशी २२० ते ३५० किलोमीटर वेगाने ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पाकरिता अंदाजे १४ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. दिल्ली ते अहमदाबाद, दिल्ली ते अमृतसर, चेन्नई ते म्हैसूर, वाराणसी ते हावडा, दिल्ली ते वाराणसी असे नवे मार्गही बुलेट ट्रेनसाठी निवडले आहेत, या प्रकल्पांना अद्याप मंजुरी नाही. त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन डीपीआर मंजुरीच्या प्रतीक्षेत
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल गेल्यावर्षीच मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. ही बुलेट ट्रेन मुंबई ते नागपूरदरम्यान खापरी डेपो, वर्षा, पुलगाव, कारंजालाड, मालेगाव जहाँगीर, मेहकर, जालना, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या शहरांतून जाणार आहे. परंतु, अद्याप या प्रकल्पाच्या डीपीआरला रेल्वे बोडनि परवानगी दिलेली नाही.
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये…
• प्रवासी क्षमता ७५०
• भूकंप झाल्यास ब्रेकिंग सिस्टीम आपोआप कार्यान्वित होणार
• भूकंप शोध आणि अलार्म सिस्टीम (यूपीएडीएएस)
• काही मार्ग एलिव्हेटेड, तर काही मार्ग भुयारी असणार



