नागपूर : विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात निर्णय दिला, तर राजकीय फटका बसू शकतो. म्हणून विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वे कर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटातील आमदार आणि खासदारांची उलटतपासणी साक्ष नोंदवण्याचे काम सुरू असताना हा दावा केल्याने चचांना उधाण आले आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, संविधानानुसार अध्यक्षांना निर्णय घ्यायचा झाला, तर तो एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाणार आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली, तर राजकीय अडचण होऊ शकते. त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. निर्णय घेण्याची वेळ आल्यावर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास आश्चर्य वाटायला नको, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
विधानसभा अध्यक्ष न्याय देऊ शकतील, असे वाटत नाही. न्यायालयाकडूनच न्याय मिळेल, असे म्हणत त्यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी मत व्यक्त केले आहे. निर्णय घेण्याची वेळ आल्यावर विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा दिल्यास त्यानंतर नवोन अध्यक्षांची निवड होण्यासाठी वेळ जाईल. तेव्हा सरकारकडून वेळकाढूपणा केला जाऊ शकतो असे म्हटले आहे.



