रांची – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावले होते. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. समन्स बजावणाऱ्या ईडीला सोरेन यांनी आतापर्यंत सहावेळा टाळले आहे.
कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने सोरेन यांना नव्याने समन्स बजावले होते. त्यासाठी त्यांना ईडीच्या रांचीमधील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले. मात्र, चौकशीसाठी हजर राहण्याचे टाळत सोरेन सरकारी कार्यक्रमासाठी दुमकामध्ये दाखल झाले. ईडीने आतापर्यंत बजावलेल्या सहापैकी एकाही समन्सला त्यांनी दाद दिली नाही. त्याऐवजी त्यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे दरवाजे ठोठावले. ईडीने बजावलेले समन्स अनावश्यक आहेत. त्या केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी विनंती त्यांनी याचिकांद्वारे केली. मात्र, दोन्ही न्यायालयांनी त्यांच्या याचिका फेटाळल्या. दरम्यान, भाजपने सोरेन यांच्यावर टीकेचे सत्र सुरू केले आहे. ईडीने सोरेन यांना पुरेसा वेळ दिला. आता ईडीने त्यांच्यावर कारवाई करावी.




