पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असलेले आणि वर्षाने वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे ‘मातोश्री’वर भेट घेतली. त्यामुळे आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार असताना पक्षातील एक नेतृत्व मातोश्रीवर भेटल्याने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी महापौर संजोग वाघेरे पाटील हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आहेत. सुरुवातीपासून शरद पवार आणि अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. संजोग वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून २०१७ मध्ये निवडणूक लढण्यास तीव्र इच्छुक होते आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही ते इच्छुक आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पार्थ अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतरही संजोग वाघेरे पाटील यांनी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे वेळोवेळी जाहीर कार्यक्रमांतून सांगितले.
दरम्यान, अजित पवार यांनी सोमवारी शिरुर लोकसभा मतदारसंघ त्यांच्याच गटाकडे असणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदासंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे जाणार हे निश्चित झाले. त्यामुळे मावळ मधून तीव्र इच्छुक असणारे संजोग वाघेरे पाटील यांनी थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मावळ लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, सचिन अहिर, आदित्य ठाकरे यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
- भाजपचा मोठा चेहरा ‘मातोश्री’च्या संपर्कात?
मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेला भाजपचा पिंपरी-चिंचवड शहरातील मोठा नेता आणि राष्ट्रवादीतील आणखी एक नेता असे तीन जण शिवसेनेच्या (ठाकरे गट) संपर्कात आहे. संजोग वाघेरे पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी प्राथमिक चर्चा केली. मात्र, संजोग वाघेरे पाटील यांनी पक्षप्रवेश केला नाही, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी सांगितले.



