कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ राखीव प्रवर्गातील लाभार्थी जातीचे बोगस दाखले सादर करून उचलत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत या तक्रारी असून, महामंडळाने सर्वच प्रकरणांची पडताळणी सुरू केल्याने बोगस करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने २९ ऑगस्ट १९९८ ला अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. मात्र, खऱ्या अर्थाने २०१४ नंतरच या महामंडळाचे काम वेगाने सुरू झाले. मराठा समाजातील तरुणांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळू लागल्याने बेरोजगार या व्यवसायात गुंतले आहेत.
मात्र, यामध्ये बोगसगिरी वाढल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाइन प्रस्ताव दाखल करताना शाळेच्या दाखल्यावर जात बदलून लाभ घेतल्याच्या तक्रारी असून, हे प्रमाण मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अधिक दिसत आहे. यासाठी महामंडळाच्या वतीने प्रस्तावांची पडताळणी सुरू केली आहे.
परिपूर्ण प्रस्ताव कमीत कमी कालावधीत मंजूर करण्याबरोबरच कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशा सक्त्त सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. काही जिल्ह्यातून शाळेच्या दाखल्यांवर जात बदलून लाभ घेतल्याच्या तक्रारी आल्याने त्याची पडताळणी सुरू आहे.
– नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील महामंडळ



