जनजागृती, लिंगनिदानावर बंदी, कायद्यानुसार कारवाईचा धाक असतानाही मुलीचे गर्भपात होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. परिणामी राज्यातील २२ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर घटला आहे. ‘मुलगाच हवा’च्या अट्टहासापायी उमलण्यापूर्वीच गर्भातच कळ्यांची हत्या केली जात आहे. दोन वर्षांत घटलेला मुलींचा जन्मदर चिंताजनक आहे.
एकीकडे मुलीच्या जन्माचे धूमधडाक्यात स्वागत केले जाते, तर दुसरीकडे कुटुंबाच्या वंशाला दिवा हवाच, यासाठी आग्रह धरला जातो.
राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथे झालेल्या बैठकीत राज्यातील लिंग गुणोत्तर प्रमाणाचा आढावा घेण्यात आला, यात ही आकडेवारी पुढे आली.
मुलीच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध उपाययोजनांची गरज आहे. शिवाय, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची आवस्यकता आहे.
■ सोनोग्राफी सेंटरची वेळोवेळी तपासणी व्हायला पाहिजे, त्या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याची गरज आहे. यासाठी समन्वयकही नियुक्त आहेत. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात किती सोनोग्राफी सेंटर आहेत. याची माहिती उपसंचालक स्तरावर घेतली जात आहे.



