पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपावर विचारमंथन सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तीन पक्षांसह आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील महाविकास आघाडीत सामील झाली आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खल सुरू असून याबाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये याआधीच सविस्तर चर्चा झाली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षासोबतही आमच्या दोन-तीन बैठका झाल्या आहेत. पुढील आठवड्याभरात आम्ही सर्व जागांवर एकमत घडवून आणू. प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी व्यापक स्वरुपात लोकांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, “एकनाथ खडसे हे रावेर लोकसभेची जागा लढणार होते. मात्र प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी आता निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता त्या जागेवर आम्ही खडसे यांच्याशी चर्चा करून योग्य उमदेवार देऊ,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या
जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगत होती. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “माझी भाजपच्या कोणत्याही नेत्यासोबत चर्चा झालेली नाही. मला भाजपकडून कसलीही ऑफर नाही. मात्र दर आठ दिवसाला माझ्याबाबत मुद्दाम अशी चर्चा घडवून आणली जाते. अशी चर्चा कोण घडवून आणतं, याचा शोध घेतला पाहिजे.



