मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश धाब्यावर बसविण्यात आल्याची दखल महाराष्ट्र प्रशासनिक लवाद (मॅट) आणि आयोगानेही घेतली आहे. आयोगाने याबाबतचा अहवाल पोलिस महासंचालक कार्यालयाकडून मागविला आहे. राज्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
निवडणुकीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची तीन वर्षे वा त्यापेक्षा अधिकचा कालावधी एका ठिकाणी झालेला असेल, त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करावी, असे आयोगाचे निर्देश आहेत. मात्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, सोलापूरमध्ये त्याच जिल्ह्यात बदल्या केल्या. काही अधिकाऱ्यांना ‘साईड पोस्टिंग’ दिल्या, तर ज्यांच्या जागी त्यांना ‘साईड पोस्टिंग’ दिले त्या अधिकाऱ्यांना तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नव्हता.
“आयोगाने घेतली पोलिस अधिकाऱ्यांची बैठक
‘आमचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, निवडणुकीशी संबंधित पदांवर आम्ही कार्यरत नाही मग आमची बदली का म्हणून? हा आमच्यावर अन्याय आहे,’ असे म्हणत या अधिकाऱ्यांनी ‘मॅट’कडे धाव घेतली.
त्यावर, याबाबत पोलिस महासंचालक व ‘मॅट’कडे ज्या बदल्यांबाबत तक्रारी आलेल्या आहेत, तेथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक निवडणूक आयोगाने घ्यावी, असे निर्देश ‘मॅट’ने दिले. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी बैठक घेतली.



