नवी दिल्ली- शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यातच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने ऊस खरेदीची किंमत आठ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऊसाची किंमत ३१५ वरुन ३४० झाली आहे. ऊस उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना ऊसासाठी योग्य किंमत देण्यासाठी या हंगामात १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या काळात किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४-२५ वर्षासाठी साखर कारखान्यांकडून प्रति क्विंटल ३४० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, गेल्या दहा वर्षात सरकार ऊस उत्पादक शेतकरी यांच्या कल्याणासाठी काम करत आहे. आधी अनेक वर्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची किंमत मिळायची नाही. त्यामुळे कारखाना मालक वेळेवर शेतकऱ्यांना पैसे द्यावे. त्यांची अडवणूक करु नये यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. मागील वर्षी ऊसाची एफआरपी ३१५ रुपये होती ती यावर्षी ३४० करण्यात आली आहे.



