पुणे : सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी मतदारसंघातून, जनतेमधून आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारच बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याचे बुधवारी पुण्यात स्पष्ट केले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार तटकरे म्हणाले, की महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची विद्यमान स्थिती, पक्षीय बलाबल आणि ताकद पाहून जागांची मागणी केली जाणार आहे. बारामती हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीकडे असल्याने महायुतीमध्ये या जागेची मागणी आम्ही करणार आहोत. महायुतीचे जागावाटप झाल्यानंतर बारामतीमधील उमेदवार जाहीर केला जाईल. कधीतरी पहिली निवडणूक लढवावी लागतेच, त्याशिवाय अनुभव कसा येणार?, सुप्रिया सुळे यांनी पहिली निवडणूक लढविली होती, तेव्हा त्यांच्याकडे तरी कुठे अनुभव होता, असाही टोला तटकरे यांनी खासदार सुळे यांना लगावला


