नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यावर निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देताना त्याचे चिन्हही बाहाल केले. त्यामुळे दुसरा गट म्हणजे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोग कोणते चिन्ह देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली.
वडेट्टीवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीत फूट पाडली. एका पक्षाची दोन शकले पडणे यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही. शरद पवार गटाला आयोगाने तुतारी हे बोध चिन्ह दिले आहे. तुतारी ही मंगलप्रसंगी वाजवली जाते व त्यासाठी ‘हाता’ची आवश्यकता असते.



