Lok Sabha Election Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात अशी स्थिती सध्या आहे. १२ ते १५ मार्च या कालावधीत या तारखा जाहीर होण्याची चिन्हं आहेत. अशात जागावाटपाच्या दृष्टीने महायुती काय करणार? याचे विविध अंदाज लावले जात आहेत.
सध्या सरकारमध्ये असलेल्या महायुतीत भाजपा, एकनाथ शिंदेंचा शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. भाजपा ४८ पैकी ३२ जागा लढवणार आणि उरलेल्या जागा मित्रपक्षांना म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सोडणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत दोन दिवस केलेल्या चर्चेत भाजपकडून महाराष्ट्रात शिवसेनेला ९ आणि राष्ट्रवादीला ४ जागांची ऑफर दिली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भाजपने स्वत:ची ३५ उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र, आपापल्या जागा वाढवून घेण्यासाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल.



