
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत वेगवान हालचाली सुरू असून, भाजपने ३० पेक्षा अधिक जागा लढविण्याची भूमिका कायम राखली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या वाट्याला १२ ते १५ जागा येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी बुधवारी संध्याकाळी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील जवळपास पाच जागांवर भाजप लढण्याच्या तयारीत असून, त्यात हिंगोली, उत्तर-पश्चिम मुंबई, कोल्हापूर, पालघर आणि यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दक्षिण-मध्य मुंबई, कल्याण, हातकणंगले, रामटेक, बुलढाणा, शिर्डी, नाशिक आणि मावळ या जागा विनासायस मिळतील, असे सांगितले जाते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बारामती, रायगड आणि शिरुर या तीन जागा कोणत्याही परिस्थितीत पाहिजे असल्याचे समजते.



