पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. मात्र दोन्ही बाजूंचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही. यामध्ये महायुतीच्या जागा वाटपाचं गणित आणखीनच किचकट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी कालच्या महाराष्ट्र दौऱ्यात महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांनी जागावाटपासंदर्भात चर्चा केली. मात्र या चर्चेनंतर देखील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप ३६ जागांवर दावा सांगत आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त दोन ते तीन जागा देण्याचा प्रस्ताव अमित शाह यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील एक आकडी जागा देऊन जास्तीत जास्त जागा लढविण्याचा भाजपचा विचार आहे. या संदर्भात अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अमित शाह यांच्या या प्रस्तावावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अमित शाह यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यात जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने यासंदर्भातील पुढील खलबतं दिल्लीमध्ये होणार आहेत.



